गोतम बुद्ध हे अस्तित्व असलेल्या ब्रम्हांडाच्या इतिहासातले एकमेवाद्वितीय पुरुष होते. ज्यांनी दु:ख आहे, दु:खाच कारण आहे, दु:खापासून मुक्तीचा मार्ग आहे हे सांगितलं. विपस्सना करताना जाणवतं की दु:खापासून मुक्तीचा मार्ग हा महापंडित, महाप्रज्ञ आणि महाविद्वान असूनही शंकराचार्यांना सांगता आला नाही. अर्थात त्यामुळे त्यांच्या मोठेपणा अजिबात कमी होत नाही. मला त्यांच्याबद्दल आदर हा आहेच.
भारताच्या भूमीत तथागत बुद्ध हे एक कमळाच फुल म्हणून उगवलेत. ते एक असे बुद्ध-पुरुष होते ज्यांनी सारं पांडित्य नाकारून सामान्यातल्या सामान्य माणसाला हीं बुद्ध-पुरुष होता येईल किंबहुना त्यासाठीच त्याचा जन्म झाला आहे हा मार्ग मोकळा करून दिला. उपनिषदांमध्ये हा मार्ग काही प्रमाणात आलेला आहे. पण तो अपौरुषेय आहे. तथागत बुद्धांचा मार्ग भारताबाहेर रुजला पण तो भारताबाहेर हद्दपार केला गेला.(ते नववे अवतार आहेत हे सगळे झुठ आहे). हा मार्ग जिथे जिथे गेलाय ते सगळेच देश आज समृध्धीच्या शिखरावर आहेत हा एक योगायोग आहे आणि मला यातून काही हीं सुचवायचे नाही.
तथागत हे भौतिक जगातल्या भौतिक समस्यांना भिडून त्यातून मुक्त होण्याचा आत्मिक मार्ग सांगणारे एकमेव पुरुष होते आणि या अर्थाने ते एकमेवच होते. एवढेच नव्हे तर संघ, बुद्ध, धम्म यांविषयी चर्चा करणे , त्यात सुधारणा करणे हे तथागत बुद्धांना मान्य होते आणि असे करणारे ते एक प्रेषित म्हणूनच भूतलावर होऊन गेले. याबद्दल अनेक दाखले मी आपणास देऊ शकतो पण काल-स्थलांअभावी मी ते आत्ता इथे देणार नाही. ते ज्याचे त्याने हवे असल्यास शोधून काढावे.
हिंदू हा धर्म नसून अनेक पंथांचा ते एक एकत्रीकरण आहे. या विषयी खूप चर्चा होऊ शकते पण ती करण्याची हीं जागा नव्हे. या पंथान्विषयी कोणताही अनादर तथागत बुद्धांनी दाखवला नाही. मला हीं तो अधिकार नाही आणि मी तो दाखवणार हीं नाही. याविषयी विस्तृत चर्चा होऊ शकते पण याला अंत नाही. यामुळे आपल्याला मन:शांती मिळणार आहे का आणि यामुळे आपल्या मनातली असुरक्षितता दूर होणार आहे का हे प्रश्न आहेत. कोण बरोबर आणि कोण चूक याबद्दल पूर्वग्रह ठेऊन वाद घातल्याने आपला अहंकार सुखावतो आणि हा अहंकार सुखावण्याच्या तथागत हे विरोधात होते.
मी जे वचन येथे टाकले होते ते "स्वतःचे दीप स्वतः बना" या तथागतांच्या भावनेने टाकलेले होते. ज्याने ते पटेल त्याने ते घ्यावे आणि ज्याला ते पटणार नाही त्याने स्वतःच्या अहंकारात दंग राहावे. मग तो अहंकार कुठल्याही बाजूचा असो.
आता अपरिहार्य म्हणून हा मुद्दा लिहितो अन्यथा या वादामध्ये मला पडायचे नव्हते.
स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे सेंट पॉल होते. त्यांना संपूर्ण बुद्ध-पुरुषाचा दर्जा देणे हे शक्य आहे का हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. हे लिहित असताना मी संपूर्णपणे चुकीचा असू शकतो हे मान्य करण्याची माझी तयारी आहे. पण या विषयाचा नीट अभ्यास केल्यावर मला हेच आढळून आले आणि त्यात गैर ते काय? सेंट पॉल हे सुद्धा संतच होते. रामकृष्ण परमहंसांनी मानवाच्या मुक्तीचा मार्ग सांगितला नसून आत्माच्या उन्नतीचा मार्ग सांगितलेला आहे. आणि हा फरक फार गहन आहे. शेवटी ज्याला जिथे जायचं आहे तो तीथेच जाणार. समुद्र समोर असला तरी आपल्याजवळ भांडे जेवढे आहे तेवढेच पाणी आपण भरू शकतो.
हीं वचने येथे टाकत असताना माझा जो हेतू होता तो पूर्ण असफल झाला. हीं वचने टाकत असताना मला अद्वैत अपेक्षित आहे, द्वैत नाही.
शेवटी एकच, भौतिक जगात सुद्धा का होईना भारताच्या तिरंग्यावरच अशोक चिन्ह आणि भारताचा चार सिंहाचा राजदंड हा तथागतांचा शिष्य असलेल्या राजा अशोकाचा आहे शिवाय भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तथागत बुद्धांना शरण गेले होते हीं गोष्ट भौतिक जगात तथागातांचे काय स्थान आहे हे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट करते.
शेवटच मुद्दा असा आहे की मी धर्म बदलला आहे का? अस कोणीतरी या चर्चेदरम्यान मला विचारले आहे. मला धर्म होताच कुठे? मी एक जनावर आहे आणि यश मिळवणं हे जवळजवळ अशक्य आहे हे माहिती असतानाहीं बुद्ध-पुरुष होण्याची धडपड करतो आहे.खरतर धर्म हीं गोष्ट अस्तित्वगत नाही. म्हणजे अस्तित्वाबरोबर येणारी नाही. जन्माला आल्यावर जर मला एका खोलीत कोंडून ठेवलं असतं आणि तिथे धर्म सोडून मला जर इतर सर्व गोष्टींचे ज्ञान दिले गेले असते आणि आज ४० वर्षांनी जर खोलीबाहेर काढून जर मला विचारलं असत तर मला धर्म म्हणजे नेमक काय हे सांगता आल नसतं. या उलट मी कोण आहे हा प्रश्न अस्तित्वात आहे. तो प्रश्न प्रत्येक क्षणी त्या बंद खोलीत हीं मला पडला असता. एक जनावर म्हणून , एक प्राणी म्हणून एक अस्तित्व म्हणून धर्म आपण ज्या अर्थाने वापरतो(शरीर धर्म नव्हे) ती आपल्या बापाच्या क्रोमोझोन मधून आलेली(त्याने ठरवलेली) सरकारी फॉर्मवर लिहिण्याची आणि हृदयसम्राटांच्या मागे लावण्याची, सामाजिक व राजकीय गोष्ट आहे. याचा मानवी किंवा प्राणीमात्राच्या अस्तित्वाशी काडीमात्र हीं संबंध नाही.
बुद्ध म्हणजे कुणी व्यक्ती नव्हे तर ति एक अवस्था आहे. तःथागत गोतमांना ती प्राप्त झाली होती. आपणा सर्वांना ती प्राप्त होवो हीं माझी इच्छा आहे. आपण सर्व माझ्यावर प्रेम करणारे तसेच माझा द्वेष करणारे हीं सर्वजण माझ्याच आत्म्याचा भाग आहात. त्यामुळे माझे जे म्हणून काही आत्मिक आहे ते या क्षणी मी आपल्या सर्वांना वाटून टाकतो. आपण कृपया त्याचा स्वीकार करावा. बुद्ध, धम्म, संघ, मी आणि कुणीही प्राणीमात्र वेगळे नाहीत.
या वादामध्ये सामील झालेल्या सर्वांना बुद्धत्व प्राप्त होवो या प्रेमपूर्वक इच्छेने मी आपला निरोप घेतो.
बुद्धं शरणं गच्छामी....
आपला,
राजू परुळेकर